Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ११

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ११



गौरवीने ती प्लेट आपल्या जवळ ओढून घेतली आणि मान खाली घालून हळूच खायला सुरुवात केली...
खात खात तिचे डोळे भरून आले... लग्नानंतर माधवला सोडल्यास कदाचित पहिल्यांदाच कोणीतरी अनोळखी व्यक्ती तिची काळजी घेत होती...

गौरवीने प्लेट उचलली आणि भुकेने तडफडणाऱ्या  पोटाला इडली-सांबार देऊन शांत केले... पोटात दोन घास गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान दिसले..., पण त्या प्रसंगाने तीच्या डोळ्यातील भीती अजूनही तशीच होती...

तीचे खाणे संपले तेव्हा हात डोळ्यांवर ठेवून ती शांतपणे सोफ्यावर बसली...

आरवने तिच्यासमोर बसून हळूच विचारले, "तू कोण आहेस...?"  कुठून आलीस...? कुठे जायचं आहे तुला...?  एवढ्या पावसात एकटीच काय करत होतीस रस्त्यावर...?" त्याच्या प्रत्येक प्रश्नाने गौरवीचा चेहरा आणखी उदास झाला...
ती काहीच बोलली नाही, फक्त डोळे खाली करून बसून राहिली...

आरवला तिची स्थिती समजली... त्याने हसत हसत सांगितले, "ठीक आहे, तुझ्यावर सांगायला जबरदस्ती नाही... जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा सांग. आता तु आधी आराम कर..."

रात्र झाली होती... आणि बाहेर पावसाने जोर धरला होता...

आरवने गौरवीकडे  पाहिले आणि शांतपणे सांगितले,
"आता रात्रीचे किती झाले बघ... तू आज इथेच राहा... माझ्या बहिणीचं बेडरूम आहे, तिथे जा आणि आराम कर... मी माझ्या रूममध्ये झोपतो..." गौरवीने हळूच मान डोलावली...
ती थकलेली आणि उदास होती, म्हणून तिने विरोध केला नाही...

आरवने तिला बहिणीच्या बेडरूमकडे नेले... ती एक स्वच्छ बेडशीट, आरामदायक खोली होती...

"चांगली शांत झोप घे... उद्या सगळं काही ठीक होईल...," असं म्हणत तीला शब्दांनी आधार देत त्याने तिच्या बेडरूमचे दार बंद केले...

आणि आरव स्वतःच्या बेडरूममध्ये निघून गेला, पण त्याला काही झोपच येत नव्हती... त्याच्या मनात गौरवीबद्दल शेकडो प्रश्न फिरत होते...  "ती कोण आहे...? काय घडलंय तिच्यासोबत...?" असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत फिरत होते...

तर दुसरीकडे, गौरवी बेडवर कोसळली होती, शरीर थकलेलं होतं..., पण मन अजूनही वेदनांच्या भोवऱ्यात अडकलेलं होतं‌‌...
डोळ्यांत साचलेले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते; ते उशीत ओघळत होते, जणू तिच्या अस्तित्वालाच पुसून टाकत होते... श्वास घ्यायलाही तिला त्रास होत होता, कारण आज तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न निर्दयपणे चिरडून टाकण्यात आलं होतं...

ज्या माधववर विश्वास ठेवून गौरवीने आपलं घर, आपली माणसं, आपली ओळख सगळी मागे टाकली… ज्या माधवसोबत आयुष्य उभारायचं स्वप्न तिने पाहिलं… त्याच माधवने आज कोणतीही शहानिशा न करता तिच्या चारित्र्यावर संशय घेतला... एका क्षणात तिला चारित्र्यहीन ठरवून, त्याने लग्नासारखं पवित्र नातं तोडून टाकलं... जणू ते नातं माणसांमधलं नव्हतेच,  ती एखादी सोयीची वस्तू होती...

तिचा गुन्हा तरी काय होता…?
हेच का की ती कमी जातीत जन्माला आली होती…?
हा जन्म, जो तिने स्वतः निवडलेला नव्हता, तोच तिचा अपराध ठरवण्यात आला…?

की मग तिने एका उच्च जातीच्या पुरुषावर प्रेम केलं, त्याच्याशी विवाह केला हा तिचा गुन्हा होता…?

समाजाने तिच्या प्रेमाला पाप ठरवलं, आणि माधवने समाजाच्या त्या विषारी विचारांसमोर मान झुकवली...

गौरवी आज दोषी नव्हती, तरीही शिक्षा तिच्याच वाट्याला आली होती...
तिचं प्रेम अपवित्र ठरवलं गेलं, तिची वेदना नाकारली गेली, आणि तिचं अस्तित्व केवळ जात या शब्दात बंदिस्त केलं गेलं...

बेडवर पडलेली गौरवी फक्त रडत नव्हती…
ती एका अन्यायकारी समाजव्यवस्थेच्या हातून हळूहळू मोडून पडत होती...


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."